छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पदमपुरा येथील हनुमान मंदिरातील चोरीप्रकरणी पोलिसांनी १५ तासांत पाच जणांच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केले. चोरट्यांकडून २ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अमजद खान सलीम खान (रा. जलाल कॉलनी), शेख शोएब शेख बाबा (रा. अलहिलाल कॉलनी), शेख समीर शेख सलीम (रा. कटकटगेट), शेख आमेर शेख नब्बू (रा. रोजावाग) आणि इमरान खान ऊर्फ इम्मा युनूस खान (रा. गल्ली. नं. ५, कटकटगेट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. .
हनुमान मंदिरात शनिवारी (दि. २४) पहाटे चोरीची घटना उघडकीस आली होती. घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पाच विशेष पथके नियुक्त करून तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले.
२० सीसीटीव्हीही तपासले
मुख्य आरोपी अमजद खान याला अटक केल्यानंतर तिघे आरोपी शेख समीर, शेख आमेर आणि इमरान खान हे बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे दर्शनासाठी गेल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा गाठून ताब्यात घेतले. मंदिर परिसरातील २० सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले. रात्रीची वेळ असल्याने चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. सायबर पोलिसांनी डिजिटल मल्टिमीडिया फॉरेन्सिक व एआय तंत्रज्ञानाची मदत घेत चोरांचे चेहरे स्पष्ट करत त्यांची ओळख पटवली. तसेच सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एआय सॉफ्टवेअरचा वापर करून संशयितांच्या चेहर्याची तुलना एमओबी (मोडस ऑपरेंडी ब्युरो) सेंटल रेकॉर्डशी करण्यात आली.














